Sunday, 10 August 2014

                                                        |  सूर्य महिमा |


                                      तपन जसा तो तप्त होऊनी ,इतरांना जो प्रकाश देतो ,
                                       दग्ध होऊनी स्वःतेजाग्नी ,तेजोमय अवकाश देतो |

                                      चंद्राचे लावण्य स्तुत्य ते, सुर्याप्रकाशी नभी झळकते ,
                                       लोप पावता रवी तेज ते , अवस तमी कसे मावळते  |

                                        मनो -निग्रही  तेज् बलाने,   ज्ञानाचे ते कोश  भरावे ,
                                        विनम्रतेच्या नम्र ओंजळी,   तेजाचे त्या अर्घ अर्पावे  |

                                        दाहकता    सूर्याची   सांगे,    कुणी स्वार्थ जवळ न यावा ,
                                         दान करिता त्या तेजाचे  ,    गर्वाचा ही  स्पर्श न  व्हावा  |

                                        निष्काम कर्म हे ,ह्यास म्हणावे ,अन वंदावे  ह्या   कार्याला ,
                                        निष्काम-योगी जो दातृत्वाचा , "अभय" नमावे त्या सूर्याला ||

  
                                     

                

x

                                                          मातृत्व

               मातृत्वाचे   दान   घेउनी,      जिवती आली तुझ्या दारी |
                       घे जननी ते तुझ्या पदरी ,     आनंद फुलू दे तुज  संसारी ||

                       श्रेष्ठ   दान  हे   निसर्गाचे ,      असे   स्त्रीला   मातृत्वाचे,
                       सार्थवचन  हे  सप्तपदीचे ,       स्त्रीजन्माच्या पूर्णत्वाचे   |

                       पावन निर्मल ठेवअसे ही,      शिव अन शक्तीच्या मिलनाची,
                        परंपरा   ही    निर्वाहाची ,      "अभय" अश्या सृष्टी-सृजनाची |     

Saturday, 8 March 2014

सूर्योदय

                                                                           सूर्योदय

शहरापासून दूर एखाद्या छोट्या खेड्यात किंवा खेड्या सदृश्य एखाद्या जागेवर  जेंव्हा आपण रात्री च्या वसतीला असतो,तेंव्हा भल्या पहाटे उठून वर आकाशातील चांदणे निरखताना सहजच विचार येतो कि ह्या आकाश सौंदर्याला नक्की उपमा कसली द्यावी.कवी मनाला ह्या सौंदर्याची भूलच पडते आणि त्याला आकशातील तारका ह्या नभ मंडपिचे  दीप,किंवा चंद्रकळेच्या पदर वरची भरजरी खडी  ,वा एखाद्या आस्मानी परीचा शृंगार वाटतो.
पक्ष्यांची किलबिलीत  एखाद्या गायकाच्या   सकाळच्या स्वरसाधनेचा भास होतो.असेच काहीसे माझ्या बरोबर घडले आणि मी तो अनुभव कविता पंक्तीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे,तो असा,


                                         भल्या पाहते उठुनी पाहता, तारांगण ते उज्ज्वल सारे,
                                         नील-नभीचे  दीप   भासती, लुकलुकणारे  शुभ्र     तारे   ||

                                          अंधाराच्या  श्याम  पदरी,    तारकांची  खाडी  भरजरी,
                                           चंद्रकळा जणू उभी नेसुनी,  निलगृही ती   निशासुंदरी  ||

                                           का? तारकांचे साज लेवुनी,  कुणी  परी ती   आस्मानी,
                                           रात्र प्रवासी "रवी" स्वागता,  उभी ठाकली सज्ज होऊनी ||

                                            भल्या  पहाटे   कोंबड्याने,  आरवातून  साद   घातली,
                                             जणू म्हणाला उठ माणसा,  रात सरली  पहाट   झाली   ||

                                            स्वर साधना पक्ष्यांची ती,   वन राईतून    कानी    येते,
                                            जाग     येते    चराचराला,   तेंव्हा आपल्या ध्यानी येते  ||
                                          
                                             अंधाराला    दूर   सारुनी,  प्राचीच्या त्या क्षितीज पटली,
                                             साक्ष देण्या "रवी" उदयाची,  रंग छटाची   नक्षी     दाटली  ||   

                                               प्राचीला उदयास येउनी ,   मावळतीला अस्त  पावतो,
                                               रात्रंदिन  तो "रवी" प्रवासी, पूर्व पश्चीम  अथक धावतो    ||

Wednesday, 22 January 2014

गंधवारा

                                                          गंधवारा
               
                 
                                   का? गंध त्या फुलांचा,वारा लुटून येतो,
                                    भेटून हा प्रियेला,सांगा कुठून येतो ||
                                 
                                    गन्धून हा असा जो,जेंव्हा कुठून येतो,
                                    स्पर्शून त्या रुपाला,कैसा कुठून येतो ||

                                     झोक्यात वाहणे हे,हा स्पर्श रेशमाचा
                                     रुसवा कधी प्रियेचा,वारा कुठून घेतो ||

                                     केसात माळलेले,गजरे ते मोगार्र्यांचे
                                     हा स्पर्श गंध त्यांचा,वारा कुठून घेतो ||

                                     घेऊन गंध सारा,त्या विसरलेल्या क्षणांचा,
                                      नकळे "अभय" आता,वारा कुठून घेतो.||                












                   

                  

Saturday, 18 January 2014

ओरखडा



रागाच्या भरात तुझा, कार वर तुझ्या नकळत किंवा तुझी चूक नसताना सुद्धा पडलेला साधा एक चरा, एक ओरखडा तुला किती तापदायक ठरतो,तू किती उद्विग्न होतोस, ते वारंवार पाहिलंय. त्या एका साधारण चर्र्याने, तुझ्या जीवाचीहोणारी चडफड आणि तुझी उद्विग्नता,तुझ्या शब्दातून व्यक्त होताना ऐकली आहे. रागाच्या भरात तुझा, तुझ्या मनावरचा,तुझ्या शब्दांवरचा सुटलेला ताबा ही अनुभवलाय. पण एक सांगू असे क्षुल्लक चरे किंवा ओरखडे ते कार वर असो किंवा शरीरावर असो, वरवरचे असतात, खोलवरचे नाही. ते दिसतात, पुसले जाऊ शकतात, कारण कारचा पत्रा किंवा शरीराची त्वचा पूर्वीसारखी एकसंध होऊ शकते, पण मनावर पडलेल्या, चर्र्यांचे, ओरखड्यांचे काय? ते दिसत ही नाही आणि खोलवर असतात, न भरण्या इतके|

भावावेशात किंवा उद्विग्न अवस्थेत,अशाच मनावरचा आणि शब्दान्वरचा आपल्या ताक़्ब सुटलेल्या अवस्थेत जेंव्हा आपण आपल्या दुखावलेल्या अनिवार भावना व्यक्त करीत असतो, तेंव्हा आपल्या तोंडून बाहेर पडणार्र्या प्रत्येक वाक्प्रचारानी, वाक्बाणानी, इतरांच्या मनावार आपण अनावधानाने, अनाहूतपणे असे अनेक चरे, ओरखडे पाडत असतो. जे आपल्या लक्षात ही येत नाही व कालांतराने कालाव्ह्या ओघात, आपण ती घटना, तो प्रसंग, कायमचे विसरून जातो. परंतु ज्याच्या मनावर आपण आघात केला असतो, त्या प्रिय व्यक्तीच्या मनावर खोलवर पडलेला तो चरा कायम राहतो, व वर म्हटल्याप्रमाणे दिसत ही नाही आणि भरत ही नाही.

काही वेळा हा लहानसा चरा हळू-हळू वाढत एका जखमेत बदलतो आणि ही न भरणारी जखम कायमचे दुखणे होऊन बसते. कालौघात फार तर तिच्या वर खपली पडते, पण ती काही कायमस्वरूपी नसते, साध्याश्या धक्क्याने ही खपली उखडू शकते व जखम पुन्हा भलभळायला लागते.

म्हणूनच सांगतो वरवरच्या चर्र्याची, ओरखड्याची, मग तो कारचा असो वा शरीराचा असो, त्याची तमा नाही बाळगली तरी चालते, पण आपल्या आचार-विचारांनी, शब्दांनी, कृतींनी, कुणाच्या मनावर जखम तर सोडाच पण साधा चरा किंवा ओरखडा ही पडणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.

Friday, 17 January 2014

वृद्धाश्रम

आपण फार पूर्वीपासून अनाथाश्रम हा शब्द ऐकत आलो आहोत. अनाथ मुलांना राहण्यासाठीचे  स्थान म्हणजे अनाथाश्रम. तसेच आता समाजात चांगलाच रुजलेला व बराच जोम धरत चाललेला शब्द आहें - वृद्धाश्रम - अनाथ वृद्ध जोडप्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे वृद्धाश्रम| अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात एक मुलभूत फ़रक़ आहे. अनाथाश्रमतील मुले, त्यांच्या आई-बापाचा पत्ता नसल्यामुळे अनाथ असतात, पण वृद्धाश्रमातील वयोवृद्ध जोडप्यांची  होण्याची स्थिती ही त्यांच्या मुलाबाळांनी, त्याच्या बद्दलची स्वतःची जवाबदारी नाकारल्यामुळे उद्भवते. ही वयोवृद्ध जोडपी उतारवयात मुलांना नकोशी झाल्यामुळे,सनाथ असून ही अनाथ ठरतात. अर्थात आईबापाना नाकारण्याची अनेक कारणे देता येतील व त्या कारणांचे समर्थन करणारे ही अनेक भेटतील. परंतु भारता सारख्या भावनिक नाती व परंपरा जपणाऱ्याआपल्या देशात,वृद्धाश्रम व्यवस्था क्लेशकारक,असमर्थनीय  आणि अशोभनीय ठरते. असे असून ही काही प्रमाणात वृद्धाश्रम व्यवस्था ही अपरिहार्य ठरते.

वृद्धापकाळात फ़क़्त दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करून भागत नाही, तर वयापरत्वे, शारीरिक दौर्बाल्यातून उत्पन्न अनेक व्याधी, मानसिक ताण-तणाव, एकलेपण, नात्यांमधील कुरबुरी, दोन पिढ्यातील वैचारिक मतभेद, परदेशस्थ मुले, कुटुंबासाठी अपुरी पडणारी राहती जागा व त्या मुले नवीन जोडप्यांची एकांत न मिळण्याच्या तक्रारी, अशा अनेक बाजूंचा विचार व व्यवस्था करावी लागते. मुळात आजची वृद्धाश्रम व्यवस्था ही पाशिमात्य देशातून आयात केलेल्या अनेक सुखवस्तू व्यवस्थापैकी एक आहे.पाश्चीमात्य देशात मुले १८ वर्षांची झाली कि ते आई-बापांच घर सोडून स्वताचा संसार थाटतात, त्यात घरातील जेष्ठ व वृध्द व्यक्तीना स्थान नसते. अशा व्यक्तींना स्वताची व्यवस्था स्वताच करावी लागते. किंवा तिकडे सरकार कडून अशा दुर्लक्षित वृध्द व्यक्तींसाठी चालवल्या जाणाऱ्या ऑर्फनेज,विडोहोमस. किंवा शेल्तेर्स मध्ये ह्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येते. पण त्या देशात ही व्यवस्था समाज व सरकार मान्य असल्यामुळे गैर मानली जात नाही.

आपल्या देशात ही,२१व्या  शतकात,एकत्रित कुटुंब पद्धतीचा ह्रास होऊन स्वतंत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब सुरु झाला. कुटुंब स्वातंत्र्य, व कुटुंबातील नव्या जोडप्यान्या एकांत न मिळण्याच्या तक्रारी सुरु झाल्या. व दिवसे दिवस वाढू लागल्या. मुलगा सून दोघे ही कुटुंब निर्वाहासाठीच्या आर्थिक जवाबदारीत भागीदार होऊ लागले. जी वृद्ध जोडपी सर्वस्वी मुलांवर आश्रित होती त्यांचा सांभाळ करण्यावरून मुलामध्ये खटके उडू लागले,मुले परदेशस्थ असल्यास, इकडे एकटे असलेल्या या वृध्द जोडप्यांची काळजी कोण घेणार? 

मुले सोबत असून ही स्वताच्या कुटुंबाच्या निर्वाहाच्या जवाबदारी बरोबरच,वृध्द आई-बापांच्या आजारीपणात त्यांची सेवा सुश्रुषा, त्यांना आवश्यक वैद्यकीय सोई सुविधा, त्यांच्या शारीरिक, मानसिक गरजांकडे लक्ष्य पुरविणे, मुलांना जड जाऊ लागले. आणि ह्या सर्व परिस्थितून मार्ग काढण्यासाठी वृद्धाश्रमाची कल्पना आपल्या देशात जोर धरू लागली. आणि मागील काही वर्षात त्याची पाळे मुळे आपल्या समाजात चांगली रुजली. आज आपल्या देशात  अनेक वृद्धश्रम कार्यरत आहेत व अनेक नवे नवे तीन तारांकित पंच तारांकित, सर्व सोयीनी युक्त असे वृद्धश्रम उदयास येत आहेत.ज्या निवृत्त जोडप्यांनी आपल्या वृद्धापकाळासाठी आवश्यक अशी आर्थिक तरतूद करून ठेवली आहे, त्यांना ह्या नवीन, सर्व सुख सोयीनी युक्त वृद्धाश्रमाचा आधार घेता येऊ शकतो.
आपल्या देशात ही आता वृद्धाश्रम व्यवस्थेला सामाजिक मान्यता मिळायला लागली आहे.आता गरज आहे ती वृद्धाश्रम व्यवस्थे कडे पाहण्याची मानसिकता बदलण्याची. आता वृध्द आणि निवृत्त जोडप्यांनी ह्या व्यवस्थेकडे फक्त भावनिक दृष्टीने न बघता, व्यवहारिक दृष्टीने बघण्याची गरज आहे. वृद्धास्राम व्यवस्था ही फक्त कौटुंबिक तडजोड नसून ती आधुनिक काळाची समाजमान्य गरज आहे, हे सत्य स्वीकारण्याची, आणि ह्या व्यवस्थेला स्वेछेनी पाठींबा आणि आधार देण्याची.

जरी ही व्यवस्था आज आपणास पाश्चिमात्य देशाची भेट वाटत असली तरी,मुळात आपल्या सनातन समाज व्यवस्थेत त्याची बीजे रुजविली गेली होती.अर्थात कालौघात आपणास त्याचा विसर पडला हे अलहिदा. आपल्याकडे सनातन काळात प्रपंचाचे जे चार आश्रम सांगितले गेले अर्थात माणसाची आयुर्मर्यादा १०० वर्षे गृहीत धरून, प्रत्येक आश्रम २५वर्शच्य काल खंडात वाटला गेला होता.
  1. पहिली पंचवीस वर्षे-ब्र्म्हचार्याश्रम-मुलांवर संस्कार व शिक्षणाचा कालखंड. 
  2. दुसरी पंचवीस वर्षे -गृहस्थाश्रम- प्रापंचिक जवाबदार्यांच्या निर्वाहाचा कालखंड. 
  3. तिसरी पंचवीस वर्षे- वानप्रस्थाश्रम-या कालखंडात आपल्या आयुष्याच्या पहिल्या पन्नास वर्षात आपली कर्तव्यपूर्ती करताना, पती-पत्नी, दोघांना एकमेकांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही म्हणून मग आयुष्याची या तिसर्या कालखंडात पती-पत्नी दोघांनी प्रपंचाची सर्व सूत्रे मुलांच्या हाती सोपवून स्वेच्छेनी वनात जाऊन, एकमेकांच्या सहवासात पुढील पंचवीस वर्षे काढावी व आयुष्याच्या पुढील व शेवटच्या पंचवीस वर्षाच्या कालखंडासाठी मानसिक आणि शारीरिक रित्या स्वतःस सज्ज करावे अशी कल्पना होती.
आयुष्याची शेवटची पंचवीस वर्षे हा त्या काळी खऱ्या अर्थाने निवृत्तीचा काळ मानला गेला होता. निवृत्ती अर्थात सर्व अशा आकांक्षाची पुरती होऊन तृप्त तन, मन, चित्त, व वृत्तीने संसारिक बंधनातून स्वतःला मुक्त करून धर्माचरण करत पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तीसाठी ईश्वरोपासना करीत शेष जीवन कंठावे.

ह्या सनातन प्रापंचिक नियमातील तिसर्या आश्रमात आपल्याला ह्या आधुनिक वृद्धश्रम व्यवस्थेचे बीजारोपण दिसते. स्वेच्छेनी स्वतः कौटुंबिक व्यवस्थेतून बाहेर पडून उर्वरित जीवन आपण आपल्यासाठीच जगायचे. स्वेच्छेनी स्वीकारलेल्या मार्गाचा अवलंब करताना, मनाला क्लेश होत नाहीत, मनात कुठले विषाद राहत नाही, किंवा कुणाच्या बद्दल तक्रार सुद्धा राहत नाही.
मग जेष्ठ नागरीकानो काय विचार आहे? वृद्धाश्राम्व्यवस्था स्वेच्छेनी स्वीकारणार न? चालला तर मग-निघू या, या आधुनिक वानप्रस्थाश्रमाकडे.

शुभास्त पंथास्ने| 

Thursday, 16 January 2014

निवृत्ती






निवृत्ती म्हणजे आयुष्याची ईती नव्हे.निवृत्ती म्हणजे अकार्यक्षम, अकृतीशील होणे ही नव्हे.निवृत्ती म्हणजे नि-वृत्ती अर्थात वृत्तीत बदल. आयुष्याच्या कार्यकक्षेत आणि कार्य पद्धतीत बदल.

नि - म्हणजे - नियोगी,नियमित, आणि निर्धारी.

नियोगी म्हणजे प्रापंचिक जीवनात कमळाच्या अलिप्ततेने राहणे. ज्या प्रमाणे कमळ चिखलात उमलते, पण चिखलात लिप्त होत नाही. त्याच्या पानांवर पडलेले पाण्याचे थेंब, मोत्याप्रमाणे पानांवर स्थिरावतात, व ओघळून पडतात त्याचप्रमाणे, निवृत्ती नंतर, मनुष्याने प्रापंचिक आयुष्यात राहताना, प्रापंचिक मोहपाशातून, हळू हळू, स्वतःला मुक्त करत, अलिप्तते कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. इच्छा-अपेक्षांना मुरड घालत, त्याचे ओझे कमी करत जावे. आचार, विचार, आणि कृती, शिस्तबद्ध आणि नियमित करत, निर्धाराने, आयुष्याच्या यशस्वी सांगते साठी, वाटचाल सुरु करावी.

शुभास्त पंथाने|