Saturday, 18 January 2014

ओरखडा



रागाच्या भरात तुझा, कार वर तुझ्या नकळत किंवा तुझी चूक नसताना सुद्धा पडलेला साधा एक चरा, एक ओरखडा तुला किती तापदायक ठरतो,तू किती उद्विग्न होतोस, ते वारंवार पाहिलंय. त्या एका साधारण चर्र्याने, तुझ्या जीवाचीहोणारी चडफड आणि तुझी उद्विग्नता,तुझ्या शब्दातून व्यक्त होताना ऐकली आहे. रागाच्या भरात तुझा, तुझ्या मनावरचा,तुझ्या शब्दांवरचा सुटलेला ताबा ही अनुभवलाय. पण एक सांगू असे क्षुल्लक चरे किंवा ओरखडे ते कार वर असो किंवा शरीरावर असो, वरवरचे असतात, खोलवरचे नाही. ते दिसतात, पुसले जाऊ शकतात, कारण कारचा पत्रा किंवा शरीराची त्वचा पूर्वीसारखी एकसंध होऊ शकते, पण मनावर पडलेल्या, चर्र्यांचे, ओरखड्यांचे काय? ते दिसत ही नाही आणि खोलवर असतात, न भरण्या इतके|

भावावेशात किंवा उद्विग्न अवस्थेत,अशाच मनावरचा आणि शब्दान्वरचा आपल्या ताक़्ब सुटलेल्या अवस्थेत जेंव्हा आपण आपल्या दुखावलेल्या अनिवार भावना व्यक्त करीत असतो, तेंव्हा आपल्या तोंडून बाहेर पडणार्र्या प्रत्येक वाक्प्रचारानी, वाक्बाणानी, इतरांच्या मनावार आपण अनावधानाने, अनाहूतपणे असे अनेक चरे, ओरखडे पाडत असतो. जे आपल्या लक्षात ही येत नाही व कालांतराने कालाव्ह्या ओघात, आपण ती घटना, तो प्रसंग, कायमचे विसरून जातो. परंतु ज्याच्या मनावर आपण आघात केला असतो, त्या प्रिय व्यक्तीच्या मनावर खोलवर पडलेला तो चरा कायम राहतो, व वर म्हटल्याप्रमाणे दिसत ही नाही आणि भरत ही नाही.

काही वेळा हा लहानसा चरा हळू-हळू वाढत एका जखमेत बदलतो आणि ही न भरणारी जखम कायमचे दुखणे होऊन बसते. कालौघात फार तर तिच्या वर खपली पडते, पण ती काही कायमस्वरूपी नसते, साध्याश्या धक्क्याने ही खपली उखडू शकते व जखम पुन्हा भलभळायला लागते.

म्हणूनच सांगतो वरवरच्या चर्र्याची, ओरखड्याची, मग तो कारचा असो वा शरीराचा असो, त्याची तमा नाही बाळगली तरी चालते, पण आपल्या आचार-विचारांनी, शब्दांनी, कृतींनी, कुणाच्या मनावर जखम तर सोडाच पण साधा चरा किंवा ओरखडा ही पडणार नाही याची काळजी आपण घेतलीच पाहिजे.

No comments:

Post a Comment