निशब्द, निरव, स्तब्ध पहाटेस, संजय गांधी उद्यानात फिरताना, रस्त्यांच्या दुतर्फा उभे असलेल्या वृक्षांच्या फांद्या आणि पानांतुन गळून चांदणे, वेगवेगळे आकार धारण करून रस्त्यावर पसरते आणि तुमच्या अंधाऱ्या वाटेत प्रकाशाचे सडे टाकते. वृक्षावरून गळणारी वाळकी पाने, कधी तुमच्या अंगावर पडतात, तर कधी तुमच्या समोर अलगद तरंगत खाली येत असतात, तुम्हाला झेलण्याचे आवाहन देत. तर कधी जमिनीवर पडताना आणि वाऱ्याच्या झुळुकीने सळसळ करून तुम्हाला, संगतीची चाहूल देतत. पक्ष्यांची किलबिल, मधूनच पिंगळ्यानचे संवाद आणि कोंबड्याचे आरवणे, नुकतेच जागे होत असलेल्या विश्वाची आठवण करून देणारी साद घालतात. सुगंध सुमनांना स्पर्शून आलेली वाऱ्याची एखादी झुळूक मनाची मरगळ घालवून प्रसन्नता आणि ताजेपण बहाल कर्ते. तर अचानक समोर धावत रस्ता ओलांडणारी हरणे, तुम्हाला सावध करून जातत. पहाटेच्या अंधुक प्रकाशात विश्रांती घेत बसलेले हरणांचे कळप मन आकर्षून घेतत. कधी कधी आपल्या पाडसास दुध पाजणारी एखादी हरिणी, आईच्या मायेची प्रचीती देवून जाते. पावलाच्या आवाजाने भिउन पळणारे किंवा जागच्या जागी थबक्णारे ससे तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचे एक हास्य पसरून जातात. अशी प्रसन्न पहाट रोज एका नवीन दिवसाच्या उजाडण्याची ग्वाही देत हळू हळू रंगमंचावरून exit घेते. अन दिवसाची सुरुवात होते.
शुभ प्रभात. शुभस्त पन्थेन.